Yogeshwari Education Society's
About Us
"श्री योगेश्वरी शिक्षण संस्था" ही राष्ट्रसेवा व समाजसेवेचा गौरवपूर्ण इतिहास असलेली मराठवाड्यातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. 'त्येन त्यक्तेन भुञ्जीथाः हे ब्रीद वचन सार्थ करणाऱ्या त्यागी व ध्येयवादी व्यक्तींची अभिमानास्पद व उदात्त परंपरा या शिक्षण संस्थेस लाभली आहे. सुमारे १०० वर्षापूर्वी शिक्षण क्षेत्रातील कोणताही खाजगी, विधायक उपक्रम हा राजद्रोह मानला जात असे. आशा काळात कै. कृष्णाजी उर्फ भाऊसाहेब चौसाळकर, कै. वासुदेवराव दसगावकर, कै. रघुनाथराव नागापुरकर, कै. श्रीधरपंत सोमण व त्यांच्या सहकार्याने लोकसेवा व लोकजागृती या ध्येयाने प्रेरीत होवून निजामांच्या जुलमी सत्तेचे अव्हान स्विकारुन इ.स. १९१८ मध्ये श्री योगेश्वरी नुतन प्राथमिक शाळेच्या रुपात एक खाजगी शाळा सुरु केली. पुढे दि. ०५ मे १९३५ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर पू. स्वामी रामानंद तीर्थ, पू. बाबासाहेब परांजपे व पू. नारायणराव जोशी, कै. त्र्यंबकराव खुरसाळे व त्यांचे सर्व सहकारी तसेच अंबाजोगाईतील कांही शिक्षणप्रेमी मंडळीनी या शिक्षण संस्थेची स्थापना करुन शिक्षणासोबतच राष्ट्रभक्तीचे धडे देत हायस्कूलचे वर्ग सुरु करुन संस्थेचा विस्तार केला. हैद्राबाद मुक्ति संग्रामानंतर ब्रम्हीभूत पू. स्वामी रामानंद तीर्थ यांनी बंद असलेली शिक्षणांची द्वारे मराठवाड्यातील गरीब जनतेसाठी खुली करण्याच्या उद्देशाने तसेच ग्रामीण भागातील गरजू व होतकरु विद्यार्थ्यात वैज्ञानिक दृष्टी निर्माण व्हावी व त्यांना विज्ञानाचे शिक्षण मिळावे या हेतुने दि. २९ जून १९५६ साली योगेश्वरी विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली. त्याकाळापासून हे महाविद्यालय मराठवाड्यातील पहिले ग्रामीण विज्ञान महाविद्यालय म्हणून व्यावसायिकदृष्ट्या सुपरिचित आहे. अनेक वादळातून, दिव्यातुन तावून सुलावून नावारुपास आलेली ही संस्था मराठवाड्याचे एक स्फुर्ती स्थान बनली असुन आज या संस्थेच्या दोन प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, एक कन्या शाळा, दोन महाविद्यालये व एक तंत्रनिकेतन कार्यरत आहे. तसेच या वर्षीपासून संरक्षण मंत्रालय भारत सरकार, सैनिकशाळा सोसायटी मान्यता प्राप्त, सैनिक विद्यालय सुरु झाले आहे. १९६१ साली भारताचे माजी अर्थमंत्री व ख्यातनाम अर्थतज्ञ मा. डॉ. सी.डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचा जो रौप्य महोत्सव साजरा झाला , त्यात केवळ औपचारिकता नव्हती तर यथाशक्ती लोकसेवा केल्याची कृत-कृतार्थताही होती. जून १९७० मध्ये विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे महाविद्यालयाचे दोन विभाग करण्यात आले. योगेश्वरी महाविद्यालय (विज्ञान शाखा) आणि स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, (कला व वाणिज्य शाखा) नोव्हेंबर १९८२ साली भारताचे माजी परराष्ट्र मंत्री मा. श्री. पी.व्ही. नरसिंहराव व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. बाबासाहेब भोसले यांच्या उपस्थितीत योगेश्वरी महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव साजरा झाला. २००६-०७ साली योगेश्वरी महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. योगेश्वरी महाविद्यालयाची नविन वास्तु उभारण्याचा संकल्प केला. आज महाविद्यालयाच्या नुतन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. २०१७ - १८ हे संस्थेचे शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरा झाले आहे. संस्थेतून केवळ पदवीधर निर्माण करणे हे महाविद्यालयाचे ध्येय नाही, तर समाजसेवेसाठी आवश्यक असलेल्या त्यागाचा वारसा घेवून आजच्या पदविधर तरुणांनी जीवनात पदार्पण करावे ही आमची दृष्टी आहे. आजचा महविद्यालयीन विद्यार्थी हे उद्याचे लोकनेतृत्व आहे. या तरुण मनात व्यापक सामाजिक जाणिवा निर्माण करुन त्यांच्यात राष्ट्रापुढील सामाजिक, राजकीय अशी शिस्तबद्ध जीवनाची व समर्पण वृत्तीची जोपासना करणे हे शिक्षण संस्थेचे कर्तव्य आहे. मराठवाड्यासारख्या मागासलेल्या विभागातील ग्रामीण परिसरातून या महाविद्यालयात येणारा विद्यार्थी अत्यंत गरीब कोणतीही शैक्षणिक परंपरा व वातावरण नसलेल्या समाजातुनच मुख्यतः आलेला असतो. सभोवतालच्या प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत त्याच्यावर उत्तम संस्कार होतील व त्याच्या व्यक्तिमत्वाची उत्कृष्ट जडणघडण होईल. यासाठी जरूर ती संधी व वातावरण त्याला उपलब्ध करुन देवून त्याचा एक संपन्न व्यक्तीमत्वात विकास करणे ही महाविद्यालयाची जबाबदारी आहे. याची संचालकांना जाणीव आहे. या जाणीवेतूनच "झाडे लावा झाडे जगवा," स्वच्छता अभियान, 'श्री गणेश व्याख्यानमाला', कर्मचारी गणेशोत्सव आणि 'महिला आत्मभान प्रशिक्षण शिबीर' असे समाजाभिमूख अनेक उपक्रम चालू केले आहेत.
योगेश्वरी महाविद्यालय,
अंबाजोगाई
